जळगाव तालुक्यातील कडगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कडगाव ते जोगलखेडा रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दिनांक २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास समोर आली आहे. दरम्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम अपूर्ण राहिल्याने ही घटना घडल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्र नातेवाईकांनी घेतला आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष यादव धनगर (वय-५५,रा.कडगाव ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.तालुक्यातील कडगाव येथे संतोष धनगर हे शेतकरी पत्नी आणि मुलासह वास्तव्याला होते. शेतीकाम व पशुपालन करून ते उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी दिनांक २७ ऑगस्ट रोजी दुपारी ते म्हशी चारण्यासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी परत येत असताना जोगलखेडा ते कडगाव रस्त्यावरील पुलाचे काम करण्यासाठी केलेल्या खड्ड्यात त्यांच्या म्हशी गेल्या होत्या.
पाण्यात गेलेल्या म्हशी या गाळात बसल्याने त्यांना काढण्यासाठी संतोष धनगर हे गेले असता तेदेखील गाळात फसले. दरम्यान घरी म्हशी काही परत आल्या. पण वडील घरी आले नाही. म्हणून मुलाने शोधाशोध केली तेव्हा त्यांना गाळामध्ये संतोष धनगर यांनी सोबत नेलेली पाण्याची बाटली दिसून आली. त्यावरून त्यांना गाळात असल्याचा अंदाज आला.
गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन संतोष धनगर यांना खड्ड्यातील पाण्यातून बाहेर काढले. यावेळी संबंधित ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवल्यामुळे एकच संताप व्यक्त केला होता. जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला होता. दरम्यान रात्री ११ वाजता मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.
गेल्या काही वर्षांपासून शेळगाव बॅरेजचे काम सुरू असल्याने असलेल्या बॅकवॉटर साठी कडगाव ते जोगलखेडा रस्ता उंच करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. हे काम औरंगाबाद येथील एका ठेकेदाराला देण्यात आले आहे. रस्ता उंच करण्यासाठी रस्त्यावर एका ठिकाणी ५०x ५० चा आणि १० फूट खोल असा मोठा खड्डा करण्यात आलेला आहे. गेल्या आठवड्याभरापासून संततदार पावसामुळे हा खड्डा पाण्याने पूर्ण भरलेला आहे. दरम्यान संतोष धनगर हे सायंकाळी म्हशी चारून येत असताना म्हशी अचानक पाण्यात गेल्या त्यामुळे ही घटना घडली.
तीन महिन्यापूर्वी संतोष धनगर यांचे नातेवाईक किरण धनगर यांनी ठेकेदाराला हे काम पूर्ण करण्याचे सांगितले होते. परंतु ठेकेदाराने बिल न निघल्यामुळे हे काम अपूर्ण ठेवले. तसेच तुम्हाला जिथे तक्रार करायची तिथे जाऊन तक्रार करावी असा दम वजा धमकी दिली होती. त्यामुळे ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांसह गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी मालती, मुलगा जयेश असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.