प्रकृती अत्यवस्थ ; शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील व्यापारी बाजारपेठेचे मुख्य केंद्र असलेल्या गांधी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून सोमवारी दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता एका मनोरुग्णाने उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वर वामन सूर्यवंशी (रा.कमळगाव ता.चोपडा) असे या इसमाचे नाव आहे. त्याच्या मागे पत्नी आणि तीन मुले आहेत. ज्ञानेश्वर सूर्यवंशी हे काही दिवसांपासून मानसिक आजारी असून डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी शनिवारी दि.११ रोजी सायंकाळी ५ वाजता सख्खी बहीण शोभाबाई राजाराम वाघ रा. गांधी मार्केट यांच्याकडे परिवारासह आले होते. एक महिन्यापासून ते कामावरून घरीच होते.
कमळगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय येथे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. अनेक दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन ठीक नव्हते त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी परिवाराने त्यांना शनिवारी संध्याकाळी बहिणीकडे जळगावात उपचारासाठी आणले होते. सोमवारी रिंग रोडवरील एका दवाखान्यात मानसोपचार तज्ज्ज्ञांना दाखविणार होते.
तत्पूर्वी आज सकाळी ११ वाजता गांधी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून ज्ञानेश्वर सूर्यवंशी याने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून हात ,पाय फॅक्चर झाला आहे. छाती, पायाला व शरीराला मुका मार लागला आहे. त्याला गांधी मार्केट मधील राहुल भोई या व्यवसायिकाने तात्काळ रिक्षा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी तपासले तर शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव, डॉ.गोपाळ ढवळे आणि सहकारी त्याच्यावर उपचार करीत असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.