रोहिणीताई खडसे खेवलकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) –गेल्या आठवडाभरामध्ये जिल्ह्यामध्ये वादळी, वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून लवकर त्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी. तसेच ग्रामीण भागातील तळागाळात कोरोनाच्या काळामध्ये जीवाची कुठलीही तमा न बाळगता काम करणाऱ्या पोलीस पाटील यांना विम्याचे सुरक्षा कवच मिळवून द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी केले आहे.
गुरुवारी दि. २४ रोजी रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगर, बोदवड,यावल, रावेर, भुसावळ तालुक्यासह जिल्हयातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात केळी, कापूस, पोटरी भरलेली ज्वारी, मका ,उडीद, मुंग, भुईमुग, सोयाबिन,व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे अजून पंचनामे सुरू झालेले नाही. जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हयातील शासनाचे प्रतिनिधी या नात्याने जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे योग्य माहिती देऊन पाठपुरावा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळवून द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
काही केळी व्यापारी हे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी न करता तत्सम परवाना न घेता भोळ्या भाबड्या केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केळी खरेदी करतात व केळीचे चुकारे देण्यास टाळाटाळ करतात. अशा नकली केळी व्यापाऱ्यांना चाप बसावा त्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसह ग्रामिण भागात महसूल आणि पोलिस खात्याचा म्हणजेच प्रशासनाचा दुवा होऊन पोलिस पाटील हे काम करतात. कोरोनाच्या गेल्या सहा महिन्याच्या काळात देखील पोलीस पाटलांनी शासकीय कामकाज पूर्ण केले आहे, असे असूनही त्यांचे जीवन सुरक्षित नाही.
या कोरोना योद्ध्यांना शासनातर्फे कुठलेही विमा कवच नाही किंवा आर्थिक मदत मिळत नाही. तरी जिल्हाधिकारी यांनी शासनाचा प्रतिनिधी या नात्याने शासनाकडे पाठपुरावा करून जिल्हयातील पोलीस पाटलांना कोरोना विमा कवच मिळवून द्यावे, अशी विंनती रोहिणी खडसे खेवलकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केली आहे.
निवेदन देते वेळी भाजपाचे अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, डॉ. अभिषेक ठाकुर, गोटु चौधरी, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.
जिल्हयातील आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी तत्वावर काम करणारे आरोग्य अधिकारी यांचे गेल्या पाच महिन्यापासून प्रलंबित असलेले वेतन मिळण्याकामी पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे रोहिणी खडसे खेवलकर यांनी आभार मानले.