अमळनेर ( प्रतिनिधी) – अमळनेरात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता शासनाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण अमळनेर शहरात आढळून आले आहे. शहरातील रुग्णाचे पॉजीटिव्ह अहवाल व मयतांची संख्या पाहता रेड झोन मधील नागरिकांची शारीरिक तपासणी युद्ध पातळीवर सुरू आहे.
काल शहरातील रेड झोन व्यतिरिक्त प्रतापनगरमधील एका बँकेचा कर्मचारी पॉझिटीव्ह आढळल्याने हा परिसर सील केला आहे. प्रशासनाने वेळ न घालवता या परिसरातील नागरिकांच्या शारीरिक तपासण्या सुरू केल्या आहेत. यासाठी पाच लोकांची टीम कार्यरत आहे, या टीममध्ये चेतन पवार (शिक्षक), सचिन पाटील(शिक्षक), भिकन पाटील (शिक्षक), कविता पाटील (आशावर्कर), ज्योती पाटील (आशावर्कर) सुरक्षा किट घालून प्रत्येक घराला भेट देऊन कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासंबंधी चौकशी करून माहिती घेत आहेत.
या बाबत नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे व आपल्याला होत असलेल्या आरोग्याच्या तक्रारी या पथकाला सांगाव्या, घराबाहेर पडू नये व अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन अमळनेरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे.







