नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – चीनने जाणूनबुजून करोना विषाणूची जागतिक साथ आणली. त्यामुळे त्या देशाकडून भारताने 600 अब्ज डॉलर्सची नुकसान भरपाई घ्यावी. त्यासाठी केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
तामिळनाडूच्या मदुराईतील रहिवासी असणाऱ्या के.के.रमेश यांनी संबंधित याचिका दाखल केली आहे. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत करोनाची निर्मिती झाल्याचा भरभक्कम पुरावा आहे. करोनाचा फैलाव भारतासह इतर देशांत, खंडांमध्ये झाला. मात्र, चीनच्या इतर शहरांमध्ये तो पसरला नाही, याकडे याचिकेतून लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच, करोनाचा वापर चीनने भारताविरोधात जैविक अस्त्र म्हणून केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
करोना फैलावामुळे अनेक भारतीयांचा जीव गेला. त्याशिवाय, भारतीय अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली. त्याबद्दल चीनकडून भरपाई घेतली जावी. एखादी व्यक्ती आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू शकत नाही. त्यामुळे तसा आदेश केंद्र सरकारला दिला जावा, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.
करोनाचा उद्रेक सर्वप्रथम चीनमध्ये मागील वर्षाच्या अखेरीस झाला. त्यानंतर जगभरात फैलावलेल्या त्या विषाणूने अनेक देशांत शब्दश: कहर केला आहे. त्यातून अमेरिकेसारखे देश करोना फैलावाचा ठपका चीनवर ठेवत आहेत.