नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना पत्र पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या महायुद्धात मिळवलेल्या विजयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किम जोंग उन यांनी हे पत्र पाठवले आहे. किम जोंग उन यांनी या पत्रातून दुसऱ्या महायुद्धातील विजयासाठी रशिया आणि पुतिन यांचे अभिनंदन केले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली.
‘करोना व्हायरस विरुद्धच्या लढाईतही रशियाला असेच यश मिळो’, असे किम यांनी या पत्रात म्हटले आहे. पुतिन यांच्याआधी किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना कौतुकाचे पत्र पाठवले होते. करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवल्याबद्दल जिनपिंग यांचे त्यांनी कौतुक केले होते.
चीन हा उत्तर कोरियाचा अत्यंत जवळचा, भरवशाचा मित्र आहे. उत्तर कोरियाचा व्यापार चीनवर अवलंबून आहे. चीन ही एकप्रकारे उत्तर कोरियाची लाइफलाइनच आहे. त्यांचा ९० टक्के व्यापार चीनवर अवलंबून आहे. चीनमध्ये करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे चीन बरोबर पुन्हा व्यापार सुरु करण्यासाठी उत्तर कोरिया प्रयत्नशील आहे असे तज्ज्ञांनी सांगितले. करोना व्हायरसमुळे मागच्या काही महिन्यात चीन आणि उत्तर कोरियामधील व्यापार मोठया प्रमाणावर कमी झाला होता.