पुणे (वृत्तसंस्था) – करोना संसर्गाचा परिणाम ग्राहकांना न्याय देणाऱ्या ग्राहक मंचाच्या कामकाजावर देखील झाला आहे. तक्रारदारांना न्याय मिळण्यास आता विलंबाचा सामना करावा लागणार आहे. यासाठी मंचात दाखल असलेल्या दाव्यांना तब्बल चार महिन्यानंतरच्या तारखा देण्यात आल्या आहेत.
लॉकडाउन सुरू झाल्यापासून ग्राहक मंचाचे कामकाज देखील बंद आहे. त्यामुळे दाव्यांना पुढील तारीखा देण्यात आल्या होत्या. मात्र, लॉकडाऊन सलग तीनदा वाढल्याने प्रलंबित दाव्यांना थेट सप्टेंबर महिन्यांमधील तारखा देण्यात आल्या आहेत. ग्राहक संरक्षण अधिनियम 1980 मधील कलम 24 (ब) च्या अधिकारानुसार याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे दावा दाखल केल्यापासून 90 दिवसांच्या आत ग्राहकांना न्याय द्यावा, हा ग्राहक मंचाचा नियम पाळणे शक्य होणार नाही. अशीच स्थिती राष्ट्रीय ग्राहक मंचाची असून तेथील प्रकरणांना दीड महिन्यानंतरच्या तारखा देण्यात आल्या आहेत.
तात्काळ प्रकरण असल्यास न्यायालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 वाजताच ते सादर करावे, असे परिपत्रक राष्ट्रीय ग्राहक मंचाचे संयुक्त रजिस्टर एस. हनुमंता राव यांनी काढले आहे. दाव्याच्या निमित्ताने मंचात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.
संबंधित व्यक्ती कुठल्या भागातून आला हे शोधणे अवघड असते. त्यांच्यामुळे करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लांबच्या तारखा देण्यात आल्या आहेत. तसेच दररोज सूनवणी होणाऱ्या दाव्यांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आपोआप गर्दी कमी होईल आणि संसर्ग वाढणार नाही, अशी माहिती मंचाकडून देण्यात आली. याविषयी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष
उमेश जावळीकर म्हणाले, गर्दी होऊन करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी रोजच्या सूनवणींची संख्या कमी करून लांबच्या तारखा देण्यात आल्या आहेत. तातडीच्या दाव्यावर मात्र सुनावणी होणार आहे.