पालघर – जिल्ह्यातील गडचिंचले तिहेरी हत्याकांड प्रकरणातील अटकेत असणाऱ्या आरोपींपैकी जवळपास २० आरोपींना वाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यातील एका आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे. २८ एप्रिलला त्याच्या स्वॅबचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, तो रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र आरोपीचा शनिवारी सकाळी प्राप्त झालेला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल सर्जन कांसन वानेरे यांनी याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला पालघर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाडा पोलीस कोठडीत त्याला इतर २० आरोपींच्या समवेत एकाच कोठडीत ठेवण्यात आले होते. तसेच चार दिवसांपूर्वीच त्या कोरोनाबाधित आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा करणे अद्याप सुरु आहे. आतापर्यंत सोबतचे आरोपी आणि इतर अशा ४४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर वाडा, गडचिंचले, डहाणू या भागातील संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. सध्या पालघर जिल्ह्यासाठी ही चिंता वाढविणारी बाब समोर आली आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यांत कोरोना बाधितांचा आकडा १६० वर पोहोचला असून त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बाधितांपैकी ५९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या एकूण कोरोना तपासण्यांपैकी २६४८ रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २१७ कोरोना चाचण्यांचे रिपार्ट येणे बाकी आहे.
गडचिंचले तिहेरी हत्याकांड प्रकरणी सीआयडीने शुक्रवारी आणखी ५ जणांना अटक केली आहे. अटक आरोपी हे सर्वजण गडचिंचले येथील राहणारे असून त्यामध्ये २ आरोपी ६० वर्षीय आहेत. या आरोपींना डहाणू न्यायालयाने १३ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.