पुणे (वृत्तसंस्था) – हरवलेले चार वर्षाचे बालक समर्थ पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या दोन तासांत पालकांच्या कुशित विसावले आहे. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बुधवारी पावणे अकराच्या सुमारास फुरकान यतीन शेख (4, रा.नाना पेठ) हा घरातून बेपत्ता झाला होता.त्याच्या घरच्यांनी जवळपास शोध घेऊनही तो सापडला नव्हता. यामुळे यतीन शेख यांनी तातडीने समर्थ पोलिसांना याची माहिती दिली.समर्थ पोलिसांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळवून ब्रॉडकास्ट करण्यास सांगितले. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक जोरे आणि पोलीस शिपाई निलेश साबळे यांना पेट्रोलिंग करताना ‘फुरकान’ दुपारी एकच्या सुमारास 15 ऑगस्ट चौकात सापडला. त्यांनी याची खबर तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली. कदम यांनी पालकांना खबर कळवताच त्याचे वडिल यतीन आणि काका अरबाज यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे पोलिसांनी मुलाला पालकांच्या स्वाधिन केले. दरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पालकांनी पोलिसांचे आभार मानले आले.