मुंबई (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर काल देशभरामध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात आला. कर्फ्यू दरम्यान देशातील जनतेने सायंकाळी पाच वाजता आपल्या राहत्या घराच्या आवारात घंटानाद करत कोरोना संकटाचा सामना करत असलेल्या डॉक्टर्स, नर्स, पोलीस यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मात्र देशातील काही ठिकाणी या घंटानाद कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाल्याने जनता कर्फ्यूच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला.जनतेने घातलेल्या गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा परिस्थितीच्या गांभीर्याची आठवण करून द्यावी लागली. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घंटानाद कार्यक्रमाला गोळा झालेल्या गर्दीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.याबाबत आपल्या ट्विटर खात्यावरून व्यक्त होताना संजय राऊत यांनी, ‘पंतप्रधान यांनी देशातील जनता लॉक डाऊनला गांभीर्याने घेत नसल्याची चिंता व्यक्त केली आहे. मात्र खुद्द पंतप्रधानांनीच देशामध्ये अशा संकटसमयी उत्सवासारखे वातावरण निर्माण केले असून यामुळे देशातील नागरिकांकडून गांभीर्याने वागण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. जर सरकार गंभीर असेल तर जनता देखील गांभीर्याने वागेल.’