पाचोरा (प्रतिनिधी) – कोरोना विषाणू गडद होत असून गुरुवारी 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत. पाचोरा येथील वरिष्ठ पोलीस अधिकार्याचा ही समावेश असल्याने यंत्रणा अक्षरशः हादरली आहे आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी पोलीस ,महसूल , पालिका अधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्या स्वतंत्र बैठका व पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. सर्व प्रमुखांशी बोलणे करून 17 मे पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आल्याचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले . विविध सूचनां संदर्भात त्वरित निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासित केले. 7 दिवसांच्या या जनता कर्फ्युस सर्वांनी सहकार्य करून घट्ट होत असलेली साखळी तोडावी असे आवाहनही केले.
आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयात अधिकार्यांची बैठक घेतली यावेळी तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले उपस्थित होते. या बैठकीत आमदारांनी प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत नाराजी व्यक्त केली. अधिकार्यां मधील मतप्रणालीतून उपाय योजनांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे स्पष्ट करून अधिकार्यांची कानउघाडणी केली. शहरातील प्रतिबंधित क्षेत्र, विलगीकरण कक्ष ,बाधितांची परिस्थिती, त्यांच्यावरील उपचारासंदर्भात माहिती घेतली.
समर्थ लॉन्स, स्वप्नशिल्प रेसिडेन्सी, विघ्नहर्ता हॉस्पिटल, राजीव गांधी टाऊन हॉल याठिकाणी बाधीत रुग्ण, त्यांचे कुटुंबीय व संपर्कात आलेल्यांना कॉरंटाईन करण्यात आले असून आता जामनेर रस्त्यावरील साईमोक्ष मंगल कार्यालय अधिग्रहित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी बाधित झाल्याचे निष्पन्न झाल्याने कोरोनाशी लढणारी एकूणच सर्व यंत्रणा कमालीची हादरली असली तरी कोरोनाशी युद्ध जिंकायचेच. म्हणून सर्वांनी कठोर नियमांची अंमलबजावणी करून कोरोनाची साखळी तोडावी अशा सूचना दिल्या.

अधिकार्यांच्या बैठकीनंतर आमदार किशोर पाटील यांनी राजकीय पदाधिकार्यांशी चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ, काँग्रेसचे साहेबराव पाटील, भाजपाचे सदाशिव पाटील या प्रमुख पदाधिकार्यांशी चर्चा करून कोरोना नियंत्रित करण्यासाठी त्यांची मते जाणून घेतली व 17 मे पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे सूचित केले .त्यास सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी मान्यता दिली. आमदार किशोर पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात डॉक्टरांशी चर्चा केली. डॉ समाधान वाघ, डॉ अमित साळुंखे, तहसीलदार कैलास चावडे ,पोलीस निरीक्षक अनिल शिंदे हे यावेळी उपस्थित होते.
शहरात तील जळगाव चौफुली, जारगाव चौफूली, कॉलेज चौफुली या शहर प्रवेशाच्या तीन प्रमुख ठिकाणी शहरात येणार्यांची चौकशी व तपासणी करण्यासाठी पोलीस, महसूल व पालिका विभागाचे संयुक्त पथक तैनात करण्याचे आमदारांनी स्पष्ट केले .
सर्व अधिकारी ,राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून 10 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 17 मे रोजी मध्यरात्री पर्यंत 7 दिवस जनता कर्फ्यू पाळण्या संदर्भात निर्णय झाला असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले.
मुस्लिम बांधवांनी रमजान निमित्त घरीच नमाज अदा करणे सुरू केले आहे . 25 _26 मे ला रमजान ईद साजरा होणार असल्याने यावेळी देखील मुस्लिम बांधवांनी घराबाहेर न पडता घरातच नमाज व विधी करावेत असे आवाहन त्यांनी केले. जनता कर्फ्यू काळात ऑनलाईन कापूस नोंदणीची प्रक्रिया शेतकर्यांनी शांततेत पार पाडावी. घराबाहेर पडू नये .नागरिकांनीही घाबरून जाऊ नये. नियम तंतोतंत पाळावेत, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी व्हीसी द्वारे पत्रकार परिषदेत केले.







