नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरामध्ये सध्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊनचा तिसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. टाळेबंदीचा हा तिसरा टप्पा इतर दोन टप्प्यांप्रमाणेच देशव्यापी असला तरी यामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या दोन टप्प्यांमध्ये बंद असलेली दारू विक्री तिसऱ्या टप्यात सुरु झाली असून यामुळे मद्यप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. असं असलं तरी दारू खरेदीसाठी मद्यप्रेमींच्या दारू दुकानासमोर लागलेल्या रांगा प्रशासनाची झोप उडवत आहेत.

अशातच दिल्ली सरकारतर्फे दारू खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी जालीम उपाय करण्यात आलाय. दारू दुकानाबाहेरील रांगा कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने मद्यपींना ऑनलाईन पद्धतीने टोकन देण्याची सुविधा उपलब्ध केलीये. विशेष म्हणजे या ऑनलाईन टोकनवर मद्य खरेदी करणाऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, मद्य खरेदीची वेळ, मद्य दुकानाचे नाव ही माहिती देण्यात येत आहे.
दिल्ली सरकारचा हा मद्य विक्रीचा ऑनलाईन टोकन फंडा सर्वत्र चर्चेचा विषय झाला असून मद्यप्रेमींकडून याचे विशेष स्वागत केले जात आहे. दिल्ली प्रमाणे इतर राज्यांमध्ये देखील अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्यास मद्य खरेदीसाठी लागणाऱ्या रांगा कमी करता येतील व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन देखील होईल अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.







