पुणे (वृत्तसंस्था) –पिंपरी, शहरात सर्वाधिक ‘करोना’चे रुग्ण आढळलेल्या आनंदनगर झोपडपट्टी परिसरातील रहिवासी पुन्हा एकदा प्रतिबंध उधळून लावत रस्त्यावर उतरले. गेल्या काही दिवसांपासून प्रतिबंधित क्षेत्रात राहत असलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला होता. त्यांनी तुफान दगडफेक अणि तोडफोड करत घोषणाबाजी केली.
‘संपूर्ण देशात लॉकडाऊन शिथिल झाले आहे. आमच्या परिसरात ‘करोना’चे जास्त रुग्ण सापडतात, हे एक राजकीय षडयंत्र आहे. त्यामुळे आम्हाला कामावर जाऊ द्या,’ अशी मागणी करीत प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर परिसरातील हजारो नागरिक पुन्हा रस्त्यावर आले. त्यांनी घोषणाबाजी करीत पोलीस बूथ, खुर्च्या आणि पोलिसांच्या खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 8) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
दोनशेहून अधिक ‘करोनाग्रस्त’
चिंचवड स्टेशन येथील आनंदनगरमध्ये दोनशेहून अधिक करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. सुरुवातीला या भागात ‘करोना’चे रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने हा परिसर सील केला होता. तेव्हा देखील 20 मे रोजी येथील नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. महापालिकेने आम्हाला जेवण, अन्न धान्य पुरवावे. किराणा माल आणि औषधांची दुकाने सुरू ठेवावीत अशी त्यावेळी नागरिकांची मागणी होती. या सर्व मागण्या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्य केल्या. त्यानंतर हा वाद मिटला होता. परंतु त्यानंतर या परिसरात ‘करोना’चा मोठा उद्रेक झाला आणि पाहता-पाहता येथे दोनशेहून अधिक रुग्ण आढळून आले आणि सातत्याने येथे रुग्ण आढळत आहेत.
सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास हजारो नागरिक घोषणा देत पुन्हा रस्त्यावर आले. स्थानिकांनी आरोप केले की, संपूर्ण देशात लॉकडाऊन शिथिल झाले असून सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. राजकीय षडयंत्रातून आनंदनगर परिसरात करोनाचे रुग्ण सापडल्याचे सांगत येथील नागरिकांना घरात बसवून ठेवले आहे. आम्हालाही कामावर जाऊ द्या, अशी मागणी येथील नागरिकांनी केली. तसेच काही जणांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी नागरिकांना आपआपल्या घरात जाण्याचे आवाहन केले.
मात्र जमाव अधिकच संतप्त झाला.
काहींनी पोलिसांच्या बुथमधील खुर्च्यांची तोडफोड केली. तर काही हुल्लडबाजांनी पोलिसांच्या खासगी वाहनांची तोडफोड करीत ती गटारात टाकली. त्यानंतर पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेत जमावावर लाठीचार्ज केला. पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती मिळताच राज्य राखीव पोलीस दलासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांची जादा कुमक येताच जमाव पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी गल्लीबोळात शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर आनंदनगर परिसरात तणावपूर्ण शांतता होती. या घटनेची चित्रफीत पोलिसांच्या हाती लागली असून त्याआधारे हुल्लडबाजांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले.