दुबई (वृत्तसंस्था) – सुरक्षा रक्षकांनी आज एका स्टिंग ऑपरेशनद्वारे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आमीर फतेह मक्की याला अटक केली. दुबईच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. मक्की हा खून, मादक पदार्थांची तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये गुंतलेल्या सर्वात धोकादायक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळीतील प्रमुख म्होरक्या आहे.
जगातील सर्वात कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार रडवान अल-तगीशी संबंधित असलेला मक्की हा इंटरपोलसाठीही वॉन्टेड होता. रडवान अल तगी हा ‘एंजल्स ऑफ डेथ’ टोळीचा प्रमुख असून त्याला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दुबईमध्ये अटक करण्यात आली होती आणि हॉलंडच्या ताब्यात देण्यात आले होते.
युरोपमधील सुरक्षा दलांना गुंगारा देऊन मक्कीने बऱ्याच दिवसांपासून तेथेच लपून राहिला होता. दुबई पब्लिक प्रॉसिक्युशन आणि युएईच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार मंत्रालयाचा समावेश असलेल्या संयुक्त टास्क फोर्सच्या प्रयत्नांनंतर त्याला अटक करण्यात आली.
सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याच्याशी संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्याची तयारी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीला रोखण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी पूर्णपणे बांधील असल्याचे युएई अधिकाऱ्यांनी सांगितले.