अमळनेर तालुक्यातील पळासदळे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पळासदळे येथील शालेय विद्यार्थिनींनी सोमवारी दि. २२ जुलै रोजी बैलगाडी आडवी लावून बस थांबवून आंदोलन केले. गेल्या दीड वर्षापासून गावाची बस बंद केली आणि दुसऱ्या बसमध्ये बसू दिले जात नाही म्हणून विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
पळासदळे येथील शालेय विद्यार्थिनी अमळनेर येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी येत असतात. पळासदळे गावासाठी स्वतंत्र बस येत होती. मात्र दीड वर्षांपासून पळासदळे बस बंद करण्यात आली. पळासदळे येथे जाणाऱ्या व रामेश्वरला येणाऱ्या बसमध्ये विद्यार्थ्यांना बसू दिले जात नाही. प्रवाशी जास्त असल्याने शालेय विद्यार्थ्यांना उतरवून दिले जात होते. १२ वाजेला शाळा असणाऱ्या मुली एक वाजेला शाळेत पोहचायचे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ग्रामपंचायतीने देखील याबाबत पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नाही. म्हणून अखेर संतप्त विद्यार्थिनींनी सोमवारी गावकऱ्यांच्या मदतीने रस्त्यात बैलगाडी आडवे लावून बस रोखली.
यावेळी बराच वेळ बस रोखून धरण्यात आली. अखेर एस टी प्रशासनाने दखल घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पळासदळे बस बंद केल्याने रामेश्वर बस मध्ये यावे जावे लागते. महिलांना प्रवास मोफत झाल्याने बस मध्ये गर्दी वाढली. मात्र पळासदळे येथे स्वतंत्र बस सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. लवकर निर्णय घेतला जाईल, असे अमळनेरचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले.









