एरंडोल ( प्रतिनिधी ) – जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनलच्या जागावाटपात जिल्ह्यातील नेत्यांनी पडती भूमिका मुद्दाम घेतल्याचा आरोप करीत काँग्रेस एरंडोल तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी बंड पुकारले आहे . या भूमिकेचा योग्य खुलासा न झाल्यास नेत्यांच्या विरोधात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा प्रदेश काँग्रेस कमिटीला पाठवलेल्या पत्रात दिला आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होताच या निवडणुकीचे पडसाद उमटण्यास सुरुवात एरंडोल येथून झाली आहे. तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी पत्रात म्हटले आहे की जिल्हा बँकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. काँग्रेस पक्षाजवळ तुल्यबळ उमेदवार होते.असे असताना आमदार शिरीष चौधरी यांनी सर्वपक्षीय पॅनल सोबत जाण्याचा निर्णय घेतला यामध्ये काँग्रेस पक्षात फक्त दोन जागा खेचून आणल्याबद्दल व पक्षाचे खच्चीकरण केल्याबद्दल आमदार शिरीष चौधरी , माजी खासदार उल्हास पाटील व जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचे अभिनंदन !
ज्या दोन जागा मिळाल्या त्यासाठी डॉ. सुरेश पाटील ( चोपडा) व सौ अरुणा पाटील ( धरणगाव ) यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस पक्ष यांच्यासाठीच काम करतो की काय अशी शंका येत आहे चार महिन्यापूर्वी यांनाच जिल्हा काँग्रेसने नियोजन समितीवर सदस्य म्हणून घेतले यापूर्वीदेखील हे बँकेचे संचालक होते. साधारण कार्यकर्त्यांनी फक्त मोर्चे आंदोलन करायची मात्र त्यांना न्याय देण्याची वेळ आली तर नेहमीच्या मर्जीतल्या लोकांना संधी देतात हे आजवर निदर्शनास आले आहे.
आपण विरोधी पक्ष असलेल्या बीजेपीबरोबर स्वार्थासाठी हातमिळवणी केलेली आहे. कार्यकर्त्यांना पक्षाच्या तिकिटावर लढण्यास सांगतात, ते व्याजाने पैसे काढून निवडणुका लढतात आपण मात्र स्वार्थासाठी समझोता करून घेता . येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी भाजपासोबत आघाडी केली तर नवल वाटायला नको. बीजेपीचे नेते आपल्या प्रमुखांवर दररोज बेछूट आरोप करत असतात असे असताना देखील त्यांच्याशी बँकेत स्वार्थासाठी हातमिळवणी का केली ?
आपल्याकडे निवडणुकीसाठी उमेदवार असताना आपण दोनच जागा का घेतल्या नेहमी आपण याच लोकांना संधी का देता त्याचा खुलासा दोन दिवसात करण्यात यावा या गोष्टीचा खुलासा न केल्यास एरंडोल तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय महाजन यांनी जिल्हा काँग्रेस समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करणार असा इशारा दिला आहे त्यांनी हे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांना पाठवले आहे.







