पुणे (वृत्तसंस्था) – पुणेकर रसिकांच्या प्रचंड उत्साहात आणि अलोट गर्दीत बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारी दैनिक ‘प्रभात’चा पहिल्या नारी सन्मान 2020 हा सोहळा मोठ्या दिमाखात व थाटात संपन्न झाला. यावेळी ‘नवचैतन्य हास्ययोग’ परिवाराच्या उपाध्यक्षा सुमन काटे यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सुमन काटे या ‘नवचैतन्य हास्ययोग’ परिवाराच्या उपाध्यक्षा. 23 वर्षींपूर्वी श्री. विठ्ठल काटे सरांनी या परिवाराची स्थापना केली, तेव्हापासून सुमन काटे या सरांससोबत अव्याहतपणे या कामात सक्रिय आहेत. आज आपली जीवनशैली बदलली आहे. कामे जास्त आणि वेळ थोडा अशीच बहुतेकांची स्थिती, त्यामुळे स्वत:साठी दिवसातला काही वेळ द्यावा म्हटले तर ही चैन परवडणारी नाही.
कामाचा प्रचंड व्याप आणि त्यातून येणाऱ्या जबाबदाऱ्या. त्यातून निर्माण होणारे दडपण आणि तणाव. हा तणाव घालवायचा कसा? तो घालवला नाही, तर मानसिक आणि शारिरीक समस्या हात जोडून उभ्या. त्यावर नंतर औषधोपचार सुरू होतात. मात्र केवळ औषधोपचारांचा उपयोग होत नाही, तर अगोदर मनाने उभारी घेतली पाहिजे. ते प्रसन्न असले पाहिजे. कारण निरोगी-सुदृढ शरिरातच निरोगी आणि प्रसन्न मन वास करते. थोडक्यात, आनंदाने जगायचे आणि स्वत:ला थोडा वेळ देत इतरांनाही प्रसन्न करायचे, या हेतूने विठ्ठल काटे सरांनी ‘नवचैतन्य’ परिवाराची स्थापना केली आणि पहिल्या दिवसापासून सुमनताई या कार्यात सहभागी झाल्या. आज ‘नवचैतन्य’च्या 180 शाखा आहेत. पंधरा हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक शाखेत येणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय म्हणजे 70 ते 80 टक्के आहे. हास्य मनातील आनंदाला जन्म देते. वर्तमानात जगायला शिकवते. घरातले मतभेद व असलेच तर मनभेद दूर करण्यास मदत होते. विशेष म्हणजे स्वत:ला व्यक्त होता होते. त्यामुळे जगण्याला एक ऊर्मी मिळते. नवा प्राणवायू मिळतो असे सुमनताई मानतात.’नवचैतन्य’च्या आतापर्यंतच्या वाटचालीत हजारो महिला आणि पुरुष त्यांना भेटले. ते कधी या परिवाराचे सदस्य झाले, हे त्यांनाही कळले नाही. इतकी आपुलकी आणि जगण्याचे टॉनिक या लोकांना नवचैतन्य परिवाराकडून मिळाले. शहरातला प्रत्येक भाग, ठिकाण, तेथील माणसे, त्यांची पार्श्वभूमी, त्यांचे विचार आणि आचार भिन्न. त्यामुळे सुमनताईंना बरेच अनुभव आले. त्यांचे अनुभवविश्व त्यामुळे समृध्द झाले. मात्र चांगला विचार आणि चांगला आचार महत्त्वाचा. लोक तुमच्या सोबत उभे राहतात. मदतीला तत्पर असतात. चांगल्या कामात सहकार्य करण्यासाठी झोकून देतात हे त्या आवर्जून सांगतात.
वयाच्या या टप्प्यावर आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत व समाधानी आहेत. आता देणे समाजाचे या भावनेतून समाजातील स्ट्रेस कमी करण्याच्या मोहिमेवर त्या कार्यरत आहेत. या कामात त्यांच्याससोबत हास्याची शिदोरी आहे. अठरा हजारांपेक्षा जास्त सदस्य संख्या असलेल्या नवचैतन्य परिवाराची संख्या लाखाच्या घरात जावी. लोकांच्या मनातील ताणतणाव दूर व्हावेत आणि त्यांनी आनंदाने निरोगी आयुष्य जगावे, यासाठी सुमनताई कार्यमग्न आहेत. विविध संस्था आणि संघटनांच्या असंख्य पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या शुभकार्याला प्रभातच्या अगणित शुभेच्छा! ‘आज धकाधकीच्या जीवनात आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंददायी जावा, यासाठी हास्याची गरज आहे, असे मार्गदर्शन नवचैतन्यदायी हास्ययोगी सौ. सुमनताई काटे यांनी केले. व्यक्तीगत पेक्षा त्या-त्या कार्याची ओळख नागरिकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. हास्यक्लबला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. याचा 15 हजार जणांना विनामूल्य फायदा झालेला आहे. पुणेकर जे स्वीकारतात ते सर्व जग स्वीकारते. हास्याची चळवळ पुढे नेण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वांचा मोलाचा वाटा मिळणे गरजेचे आहे,’ असे काटे म्हणाल्या. त्यांनी केक कापण्याबाबतचा हास्याचा प्रकार सादर केला. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजराने उत्तम दाद दिली. कुटुंबीयांनी सतत सहकार्य केल्यामुळे ‘प्रभात’ने केलेला सन्मान हा माझा एकटीचा नसून तो कुटुंबीयांचा आणि संपूर्ण टीमचा सन्मान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.