मुंबई(वृत्तसंस्था) – राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेती झेन सदावर्ते हिने शिवसेनेच्या नेत्याकडून आपला अपमान केल्याचा आरोप केला आहे. मराठीत भाषण न केल्यामुळे मला भाषण करून देण्यात आले नाही, असे तिने म्हटले आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना तिने सांगितले की, मुंबईत महिलादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी सध्या देशात कशाप्रकारे चुकीच्या गोष्टी सुरु आहेत, हे मी उपस्थितांना सांगत होते. मी हे सर्व हिंदी आणि इंग्रजी भाषेत बोलत होते. उपस्थित लोकांची त्याविषयी तक्रार नव्हती. मात्र, माझे भाषण सुरु असताना व्यासपीठावरील शिवसेनेच्या महिला नेत्याने मला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझा अपमान करायला सुरुवात केली. तुला भारतात राहायचे असेल तर मराठी शिकण्याची आवश्यकता आहे, असे सांगत महिला नेत्याने माझ्या हातातून माईक हिसकावून घेतला. माझे भाषण रोखण्यात आले, असे झेन सदावर्ते हिने सांगितले.