मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेले प्रवासी, विद्यार्थी, मजूर आणि इतरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी गुरुवारपासून (7 मे) महाराष्ट्र राज्या महामंडळाच्या बसेस धावतील, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

“एसटीच्या तब्बल 10 हजार बसेसच्या मार्फत राज्यभरामध्ये लोकांना त्यांच्या गावी वा तालुक्याला मोफत सोडलं जाईल. यासाठी 20 कोटींचा खर्च अपेक्षित असून हा खर्च आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन विभाग करणार आहे. प्रवाशांसाठी ही सेवा मोफत असेल,” असं वडेट्टीवार म्हणाले.
“परराज्यातले मजूर पाठवण्यासाठी जशा याद्या तयार केल्या तशाच पद्धतीनं जिल्ह्याजिल्ह्यात अडकलेल्या लोकांच्या याद्या तयार करण्यात येतील, तसंच एक पोर्टल त्यासाठी तयार करण्यात येईल,” अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
या प्रक्रियेला 7 मेपासून सुरुवात होणार असून, त्यासाठीची आखणी आणि तयारी सध्या सुरू असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलंय. कोरोनासाठीच्या सगळ्या नियमांचं पालन करून ही प्रवासी वाहतूक केली जाईल.
राज्याच्या विविध भागात अडकलेले मजूर, प्रवासी, यात्रेकरू, विद्यार्थी, नोकरीनिमित्त वेगळ्या गावी असणारे, नातेवाईकांकडे अडकून पडलेले अशा सगळ्यांना या सेवेचा लाभ मोफत घेता येणार आहे. येत्या 4 ते 5 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.







