पुणे (वृत्तसंस्था) – महापालिकेची सर्व यंत्रणा सध्या करोनाच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी व्यस्त आहे. तथापि, पावसाळा अवघा सव्वा महिन्यावर आला असल्याने पावसाळ्यापूर्वी करावयाची अत्यावश्यक कामे करणे गरजेचे आहे. त्याशिवाय, राज्याच्या नगरविकास खात्याने हिरकमहोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान अंतर्गत सुचविलेली शहर पातळीवर आवश्यक कामे देखील करण्यात यावीत, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
बाबर यांनी याबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या पावसाळा सव्वा महिन्यावर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी अत्यावश्यक कामे करणे गरजेचे आहे. रस्त्यांवरचे खड्डे बुजविणे, रस्त्यांच्या आतमध्ये गेलेले चेंबर्स रस्त्याला समतल आणणे, नाल्यांची साफसफाई करणे, वाळलेली झाडे किंवा त्यांच्या फांद्या तोडणे, अंतर्गत किंवा मुख्य रस्त्याची डागडुजी करणे, रस्त्यावर पाणी साठणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
त्याशिवाय, राज्य सरकारने 1 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत हीरक महोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याचे निर्देश दिले आहेत. शहराला सध्या करोना आजाराच्या साथीने ग्रासले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांची आरोग्यविषयक आणि पर्यावरणविषयक कामे फक्त हाती घ्यावीत. शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय जास्तीत जास्त करोनाविषयक चाचणी करून घ्याव्यात. पर्यायाने, करोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यास मदत होईल.