औरंगाबाद :(वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह करून देणारी दलालांची रॅकेट राज्यात सक्रिय आहेत. भिवंडीत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा महाभयंकर प्रकार अलिकडेच उघडकीस आणला आहे, असा धक्कादायक गौप्यस्फोट विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. सरकारनं याची गंभीर दखल घ्यायला हवी, अशी मागणी देखील प्रवीण दरेकर यांनी केली आहे. कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी ते औरंगाबादमध्ये आले होते.
वैद्यकीय व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांनी आज (रविवार) विविध मुद्यांवर चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. प्रवीण दरेकर यांनी राज्यात कोरोना संसर्गाच्या साथीची परिस्थिती भयंकर असल्याचा आरोप केला. राज्यात दलालांची रॅकेट सुरु असल्याचा आरोप केला. एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट कोणत्या हॉस्पिटलला पाठवायचा याचा निर्णय हे दलाल घेत आहेत. त्यांची रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालयांशी डील झालेली असते. मात्र, हे महाभयंकर प्रकार सरकारला माहीतही नहीत, अंस दरेकर म्हणाले. मुंबईसारख्या ठिकाणी आतापर्यंत केवळ दुर्लक्षामुळं अनेकांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनची यंत्रणा नाही. रुग्णवाहिका नाही आणि व्हेंटिलेटरही नाहीत, अशी अवस्था मुंबईची झाली असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
बिलाच्या पैशाचा परतावा द्यावा
सरकारचे लॅबवरील कंट्रोल राहिलेले नाही. सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या उद्धवस्त झाला आहे. त्याला प्रचंड त्रास होत आहे. हॉस्पिटलची बिलं परवडत नाहीत. खासगी रुग्णालये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल घेत आहेत. सरकारच्या कारवाईच्या इशाऱ्याला ते भीक घालत नसल्याचे दिसत आहे. सरकारनं त्याची दखल घेतली पाहिजे. लोकांना खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या बिलाच्या पैशाचा परतावा दिला पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
हा सगळा केविलवाणा प्रकार
सरकारच्या चुका लक्षात आणून दिल्या की आमच्यावर राजकारण केल्याचा आरोप होतो. कोरोनावर कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ नये. सरकारच्या अपयशापासून सगळं लक्ष विचलित व्हावे यासाठी भाजपवर राजकारणाचा आरोप केला जातो. त्यासाठी कधी केंद्राकडे बोट दाखवले जाते तर कधी अस्मितेचे प्रश्न उभे केले जातात, हा सगळा केविलवाणा प्रकार असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.