पुणे (वृत्तसंस्था) – दौंड तालुक्यातील गिरीम गावात गांजाची शेती करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्तपणे संबंधित ठिकाणी छापा टाकून एकूण 21 लाख 1 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकास अटक करून शनिवारी (दि. 6) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची म्हणजेच मंगळवार (दि. 9) पर्यंत कोठडी सुनावली आहे.
दत्तू शंकर शिंदे (वय 47 रा. गिरमी, ता. दौंड) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. तर दौंड पोलीस ठाण्याचे हवालदार कल्याण शिंगाडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गिरीम येथे गांजाची शेती करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी छापा मारला असता, तेथे गांजाची एकूण 173 झाडे, विक्रीसाठी ठेवलेला 2 पोती गांजा असा एकूण 140 किलो 100 ग्रॅम मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, दौंडचे निरीक्षक सुनील महाडिक, दत्तात्रय गुंड, दत्तात्रय जगताप, रविराज कोकरे, अनिल काळे, सचिन गायकवाड, रौफ इनामदार, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, चंद्रकांत जाधव, महेश गायकवाड, निलेश कदम, काशिनाथ राजपुरे, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.