नाशिक (वृत्तसंस्था) – लॉकडाऊन दरम्यान नाशिककरांना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सर्व दैनंदिन व्यवहार, दुकाने, आस्थापना सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळं महिनाभरापासून संचारबंदीत असणाऱ्या नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र निर्बंध शिथील करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही आवश्यक असणार आहे. नवीन नियमानुसार रेड झोनमध्ये सकाळी 10 ते दुपारी 4, ऑरेंज झोनमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी राहणार आहे. मालेगावात मात्र संचारबंदीचे नियम अधिकच कडक करण्यात येणार आहे. जर आदेशाचं उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.