मुंबई (वृत्तसंस्था) – जामखेड करोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या गरिबांनवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्याची दखल घेऊन अनेक दानशूर पुढे येऊन त्यांच्या जेवणाची सोय करत आहेत. आता गरिबांच्या मदतीसाठी शेतकऱ्यानेही पुढाकार घेतला असून, तालुक्यातील शिऊर येथील शेतकरी आपल्या पेरू बागेतील दहा टन म्हणजे पाच लाख रुपयांचे पेरू या गरजूंना मोफत वाटणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे कौतुक होत आहे. करोना विषाणूचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले असून, संचारबंदीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीतील कामे थांबली आहेत. तालुक्यातील शिऊर येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांच्या बागेतील पाच लाख रुपयांचे दहा टन पेरू फळे पक्व झाली आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे ती शहराच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. एकीकडे शासनाने भाजीपाला व फळांना विक्री करण्यासाठी परवानगी दिली आसली, तरी दुसरीकडे करोनाच्या भीतीने गावातील स्थानिक वाहनचालक शेतीमाल पुणे, मुंबई येथे घेऊन जाण्यास तयार नाहीत. त्यातच सध्या पेरू सारख्या फळाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे निंबाळकर यांनी आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून त्यांनी पाच लाख रुपये किंमत असलेला साडेतीन एकरांवर लागवड केलेला पेरू गरिबांना वाटप करण्याचा निर्णय घेतला. याबाबत जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांच्याशी पेरू वाटप करण्याबाबत चर्चा केली आहे. त्यांनी देखील निंबाळकर यांच्या शेतात भेट दिली असून, याबाबत शेतकऱ्याने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच वरिष्ठांशी चर्चा करुन पेरू वापट करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, नवनाथ लांडगे, उपसरपंच सिद्धेश्वर लटके, तलाठी सचिन खिळे, गणेश निकम, आजिनाथ निकम, नाना सावंत, महादेव झरकर, बदाम निंबाळकर, वसंत निंबाळकर उपस्थित होते. एकीकडे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास शासन प्रयत्नशील आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. संचारबंदीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, फळे परिपक्व झालेले असताना तोडणी करता येत नाही. जिवापाड जपलेली फळे जागेवरच सडून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येत आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने हा माल बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे करोनाच्या संकट काळात काम करणाऱ्या कर्मचारी व गरिबांना मोफत सर्व बागेतील पेरू वाटप करण्याचा संकल्प केला आहे. तसेच लॉकडाऊनमुळे माझ्या कडील दोन एकर कार्ले व एक एकर शेवगा देखील शेतात पडून असल्याचेही संदीपान निंबाळकर यांनी सांगितले.