नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आतापर्यंत ४९० नवीन रुग्ण आढळले आहेत. यावरून सोशल मीडियावरही अफवांचे पेव फुटले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना करोना व्हायरसची लागण वृत्त पसरले आहे. यासंदर्भात आता थेट सरकारच्या पत्रसूचना विभागालाच (पीआयबी) खुलासा करावा लागला आहे. काही दिवसांपासून एका वृत्तवाहिनीचा स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका वृत्तवाहिनीवर अमित शहा दिसत असून हिंदीमध्ये ‘गृहमंत्री अमित शहा करोना की चपेट मे’ असे लिहिण्यात आले आहे. यावर आता पीआयबीने ‘पीआय़बी फॅक्ट चेक’ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर स्पष्टीकरण दिले आहे. या ट्विटमध्ये एका हिंदी वृत्तवाहिनीच्या नावाने मॉर्फ केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. या फोटोमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा फोटो खोटा असून गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूने तो व्हायरल केला जात आहे. कृपया हा फोटो शेअर आणि फॉर्वड करु नका, असे आवाहनही करण्यात आले आहे.