मुंबई (वृत्तसंस्था) –पेठ, सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात बुधवारी (दि. 3) झालेल्या वादळ व पावसाने सुमारे लाखो रुपांचे नुकसान झाले आहे. तरी तातडीने शेतकरी व नागरिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाने करून लॉकडाऊनच्या कालावधीत नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पेठ येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेले पोलीस चेकपोस्टच्या राहुट्या व मंडप वादळाने उद्ध्वस्त झाले. जवळ असलेल्या पंचवटी ढाब्याचे सर्वच पत्रे, माळी मळा येथील सुधाकर रासकर यांच्या गायीच्या गोठा व घराची कौले, शाम काळे यांच्या पॉलिहाऊसचे शेड नेट व पत्र, प्रमोद धुमाळ यांच्या पोल्ट्रीचे सर्व पडदे, वळईवरील व पडवीचे पत्रे, वेतळबुवा मंदिरा जवळील खांबाच्या विजवाहक तारा तुटल्या आहेत. तळेकर वस्तीवर जाणाऱ्या रस्त्यावर मोठे बाभळीचे झाड आडवे पडले आहे.
वलखेड वस्ती येथील पोलीस वायरलेस कार्यालया जवळ असलेले गणेश मंदिराचे मंडपाचे सर्व पत्रे, थुगाव येथील प्राथमिक शाळेच्या आवारात एक जुने मोठे झाड पडले आहे. तर येथील शेतकरी शिवराम एरंडे यांच्या घराची सर्व कौले उडून घरात पावसाचे पाणी साचले आहे. पेठ येथील विनोद आनंद धुमाळ यांच्या घराजवळील विद्युत खांब उन्मळून पडले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 जुनी मोठी निलगिरीची झाडे आडवी झाल्याने रुग्णांना दवाखान्यात येण्याचा मार्ग बंद झाला.
पंचायत समिती माजी सदस्य मनोहर भालेराव यांच्या घराला लागून असलेल्या पडवीचे पत्र्याचे शेड उडून गेले. दिलीप पवळे यांची वळई वाऱ्याने उडून नुकसान झाले आहेत. श्रीकांत गोविंद धुमाळ या शेतकऱ्यांच्या बागेतील आंबे, चिक्कू, डाळिंब व इतर झाडे पूर्न उन्मळून पडली आहेत.
श्रीक्षेत्र सौरग्या डोंगरावरील श्री दत्त मंदिराच्या स्लाईडिंग खिडक्यांच्या काचा फुटून मंदिरात काचांचा खच पडला आहे तर मंदिर परिसरातील दोन विजवाहक खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मंदिरातील भाविकांना पाणी पुरविणारी 2 हजार लिटर क्षमतेची टाकी उडून डोंगरा खाली पडून तुकडे झाले आहेत.
पेठ परिसरात बुधवारी (दि. 3) सकाळी वीजपुरवठा खंडित झाला तो गुरुवारी (दि. 4) दुपारी सुरळीत झाला. तर अनेक शेतकऱ्यांची कांद्याची चाळ भिजली. पत्रे उडाले. घरे व जनावरांचे गोठे उद्ध्वस्त झाले आहेत.