नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – गुजरातमध्ये राज्यसभा निवडणूक होणार आहेत त्याअगोदरच राज्यात राजकीय वर्तुळात अनेक खळबळजनक घटना घडत आहेत. काँग्रेसने दोन उमेदवार उतरवले असून, भाजपाने तीन उमेदवार दिले आहेत. भाजपाने संख्याबळ नसताना तिसऱ्या जागेसाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. दरम्यान, भाजपचा हा डाव यशस्वी झाल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी गुरूवारी राजीनामे दिले होते. त्यानंतर आज आणखी एका आमदाराने राजीनामा दिल्याने राजीनामा देणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांची संख्या ८ वर गेली आहे.
गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गृह राज्यात तीन उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिले होते.
निवडणुकीची नवी तारीख जाहीर झाल्यावर आणखी दोन आमदारांनी गुरुवारी राजीनामे सादर केले. राजीनामे दिलेल्या आमदारांची संख्या सात झाली होती. त्यानंतर आणखी काही आमदार राजीनामे देतील, असा दावा भाजपकडून करण्यात आला होता. भाजपाचा दावा खरा ठरताना दिसत आहे.
शुक्रवारी काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. राज्यसभा निवडणूक तोंडावर असतानाच काँग्रेसच्या आठव्या आमदाराने राजीनामा दिला. गुजरात विधानसभेच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.