पुणे (वृत्तसंस्था) – गुंगीचे औषध देऊन ओळखीच्या विवाहित तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीला 25 हजार रुपयांचा जामीन सत्र न्यायाधीश आर.यु.मालवणकर यांनी मंजुर केला. या प्रकरणातील पीडित तरुणीने गुन्ह्यातील तपासासाठी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला होता. सतीश आनंद सोनवणे (वय 40 ) असे त्याचे नाव आहे. त्याने अॅड. राहुल नायर आणि अॅड.अभिषेक अवचट यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्याविरुद्ध पीडितने खडकी पोलिसात फिर्याद दाखल आहे.
पीडित आणि आरोपी एकमेकांना दहा वर्षापासून ओळखत होते. तिचे नवऱ्याशी भांडण असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने चहामधून गुंगीचे औषध देवून तिचे अश्लील फोटो काढले. तिला ब्लॅकमेल करून वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात तपास करण्यासाठी पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. मात्र, तिथे तिने तपासणीला नकार दिला होता.
फिर्यादीने खोटी तक्रार दाखल केली असून , फिर्यादीचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते. आरोपीविरुद्ध एक वर्षाच्या विलंबाने खोटी फिर्याद दाखल केली असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.