नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे देशात वातावरण बदलले आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांचे यामुळे मोठे हाल झाले. दरम्यान, जे कामगार कामासाठी दुसऱ्या राज्यात जातात, त्यांनी यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी, असे आवाहन झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले आहे.
परराज्यात काम करणाऱ्या कामगारांची माहिती राज्य सरकारकडे असायला हवी, जेणेकरून अशा कामगारांना काही त्रास झाला तर सरकार मदत करू शकेल. यासंदर्भात राज्य सरकार आदेश काढणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. लॉकडाउन झाल्यानं विविध ठिकाणी मजूर अडकून पडले होते. राज्यांच्या तसेच जिल्ह्यांच्या सीमा प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. दुसरीकडे रोजगार बंद झाल्याने कामगारांनी घराकडे स्थलांतर सुरू केले.
मागील दीड महिन्यापासून हा प्रश्न चर्चेत आहे. स्थलातरित कामगारांच्या प्रश्नावरून महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यात शाब्दिक चकमकही झाली होती. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर झारखंड सरकार पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. परराज्यात कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांनी राज्य सरकारची परवानगी घेण्याचं आवाहन झारखंड सरकारने केले आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सोरेन म्हणाले, परराज्यात कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांनी बाहेर जाण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी. दुसऱ्या राज्यात असलेल्या कामगारांना काही समस्या आल्या अथवा प्रश्न निर्माण झाले, तर त्यांची मदत करण्यासाठी सरकारकडे ही माहिती असायला हवी, असे सोरेन म्हणाले.