जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाचे संशयित म्हणून दाखल करण्यात आलेले दोन रूग्ण रात्री उशीरा जिल्हा रूग्णालयात मृत झाल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांच्या चाचणीचा अहवाल अजून येणे बाकी आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच एका कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. यानंतर जिल्हा रूग्णालयात दोन रूग्ण दाखल झाले होते. त्यांचे सँपल घेण्यात आले असले तरी त्यांचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. या पार्श्वभूमिवर, रात्री उशीरा दोन्ही रूग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे महाधिष्ठाता डॉ. भास्कर खैर यांनी रूग्णालयात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना संशयित म्हणून दाखल केले होते या माहितीला दुजोरा दिला. तथापि, या दोघांचे स्वॅप सँपल पाठविण्यात आले असून याचा रिपोर्ट येणे बाकी असल्याचे याबाबत आजच विधान करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. आज या दोघांचा अहवाल अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वीच मेहरूण भागात वास्तव्यास असणार्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा मृत्यू झाला होता. या रूग्णाच्या पार्थिवावर अतिशय काळजीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या अनुषंगाने रात्री मृत झालेल्या दोन्ही रूग्णांच्या कोव्हीड-१९ चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या अंत्यसंस्काराबात शासनातर्फे निर्देश दिले जातील असे मानले जात आहे.