मुंबई (वृत्तसंस्था) – पिंपरी-चिंचवड महापालिका, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्यातर्फे मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून ‘डॉक्टर आपल्या दारी’ या उपक्रमाला आज सुरुवात करण्यात आली. करोना साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांच्या दारापर्यंत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करोनासदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या माध्यमातून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले. करोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. इतर सामाजिक संघटना या कार्यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स यांच्या वतीने ‘मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅन’ शहरातील दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात जाऊन नागरिकांची वैद्यकीय तपासणी करणार आहे. त्यामध्ये महापालिकेचे वैद्यकीय पथक सहभागी होणार आहे. या पथकाकडून शहरातील 60 वर्षे वयोगटापुढील नागरिक आणि भिक्षेकरी यांचीही मोफत तपासणी केली जाणार आहे.पिंपरीतील महापालिका भवनासमोर सुरू करण्यात आलेल्या उपक्रम प्रसंगी आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहायक आयुक्त मंगेश चितळे, अण्णा बोदडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. परिणामी छोट्या आजारांच्या तपासणीसाठी रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी या मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनची व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. ज्या परिसरामध्ये ही व्हॅन उभी करण्यात येईल तेथे ध्वनीक्षेपकाद्वारे रुग्णांना तपासणीकामी येण्याबाबत विनंती केली जाईल. डॉक्टर कोणाच्याही घरी न जाता व्हॅनमध्येच संबंधिताची आरोग्य तपासणी करतील. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांनी मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधणे सक्तीचे असेल. सर्दी, खोकला, नाक गळणे, अंगदुखी ही लक्षणे अनेक प्रकारच्या विषाणूजन्य तापामध्येसुद्धा दिसून येतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. महापालिकेने वेळोवेळी केलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. वैद्यकीय तपासणी केल्यामुळे एखाद्या रुग्णामध्ये करोना आजाराची लक्षणे आढळल्यास संबंधितांना वेगळे करून पुढील वैद्यकीय चाचण्या केल्या जातील.