जळगाव ( प्रतिनिधी )– धावती इंडीका कार आगीत जळून खाक झाल्याची घटना आज राष्ट्रीय महामार्गावर गोदावरी हॉस्पिटल ते साकेगाव दरम्यान दुपारी ४ वाजता घडली . गाडीतील तापमान वाढले असल्याचे लक्षात आल्यावर गाडीतील तिघे जण गाडी साईडला थांबवून उतरून गेल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही .
दीपनगर येथील रहिवाशी काळे हे त्यांच्या २ मित्रांसोबत आज त्यांच्या एम एच १९- ए एक्स – ६३५४ क्रमांकाच्या कारने दीपनगरहून जळगावकडे जात होते गोदावरी हॉस्पिटल ते साकेगाव दरम्यान गाडीचे तापमान वाढल्याचे लक्षात आल्यावर गाडी चालवत असलेले काळे यांनी रस्त्याच्या कडेला घेऊन कार थांबवली . त्यानंतर आधी इंजिनातून धूर येत असल्याचे त्यांनी पहिले , त्यानंतर काही मिनिटांनीच या गाडीने पेट घेतला . गाडीतील तिघे जण गाडी थांबवून उतरून गेल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही .
जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन ही आग आटोक्यात आणली . संतोष तायडे, अश्वजीत घरडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, तेजस जोशी, नितीन बारी या अग्निशमन कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश होता . महामार्गावर वाढत्या रहदारीची समस्या नसती तर अग्निशमन दलाचे कर्मचारी आणखी वेगाने घटनास्थळी पोहचू शकले असते , असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले . त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.