जळगावातील वाघ नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील वाघ नगर येथे मंगळवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता सुमारास नळाचे पाणी भरत असताना व मोटार सुरू करीत असताना विजेचा धक्का लागल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
संदीप हिरामण भालेराव (वय ३८, रा. वाघ नगर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. तो पत्नी, दोन मुले, आई यांच्यासह वाघ नगर येथे राहत होता. एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी संदीप भालेराव यांची पत्नी माहेरी गेली होती. घरी फक्त संदीप आणि त्याचे आई एवढेच होते. त्यावेळेला नळाचे पाणी आले.
पाणी भरत असताना व मोटार चालू करताना विजेचा धक्का लागल्यामुळे ते जागीच फेकले गेले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासून मयत घोषित केले. कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी एकच आक्रोश केला.
रामानंदनगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.