जळगांवात मुली पुरवण्याचे राष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील बस स्थानकाजवळील चोपडा मार्केट परिसरात असलेल्या हॉटेल लय भारी येथे सुरू असलेल्या देहविक्रयप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात हॉटेलच्या व्यवस्थापकासह तीन कामगारांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून मुली पुरवणारा पाचवा संशयित आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, सुरत येथील पाच तरुणींना ताब्यात घेतले असून त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. बस स्थानकाजवळील हॉटेल लय भारी येथे देहविक्री व्यवसाय चालतो. या माहितीवरून पोलिसांनी एजंट पाठवून छापा टाकला. त्या ठिकाणी हॉटेलचा व्यवस्थापक सागर बापू बहिरे (वय २८, रा. तिसगाव ता. देवळा जि. नाशिक) याच्यासह तीन कामगार सोमनाथ बबन पवार (वय २२ रा. उमराणा ता. देवळा), जयेश उर्फ पाचा देविदास तायडे (वय २७ रा. हरिओम नगर, आसोदा रोड, जळगाव), किरण विजय सुरवाडे (वय ३० रा. तांबापुरा, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.
तसेच पश्चिम बंगाल येथील रहिवासी दोन, उत्तर प्रदेश एक, सुरत एक आणि ठाणे येथील एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व महिलांची रवानगी सरकारी महिला वसतीगृहात करण्यात आले आहे. तर संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान मुली पुरवणारा पाचवा संशयित आरोपी प्रवीण आहेर (पूर्ण नाव गाव माहिती नाही) हा फरार असून पोलीस तपास करीत आहेत. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल हे करीत आहेत.