नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिल्यामुळे बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ही माहिती समोर आल्यापासून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारनेही आता या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
केरळमध्ये हत्तीणीच्या झालेल्या हत्येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची कसून चौकशी करुन दोषींना ताब्यात घेतले जाईल व कठोर कारवाई केली जाईल. फटाके खायला देऊन हत्या करणं ही भारताची संस्कृती नाही, असे केंद्रीय वनमंत्री तथा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. तर, प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ह्यूमन सोसायटी इंटनॅशनल/इंडियाने (HSI) या घटनेसाठी दोषी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 50 हजार रुपये बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय हत्तीणीच्या मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना दिली.
वन-विभागानेही मारेकऱ्यांचा शोध सुरु केला असून दोषी व्यक्तींना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. तर, केरळमध्ये स्थानिक शेतकरी रानडुकरांपासून शेताचं संरक्षण व्हावं यासाठी फटाक्यांनी भरलेल्या अननसाचा वापर करतात. हत्तीण अन्नाच्या शोधात जंगल सोडून जवळील गावात शिरली होती. याचदरम्यान हत्तीणीने हे फळ खाल्ले असावे अशी शक्यताही वन-अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.







