पुणे (वृत्तसंस्था) – विद्यापीठाचे परीक्षांचे निकाल, आगामी शैक्षणिक वर्षाची तयारी, प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थी संबंधित शिष्यवृत्ती, आगमी काळासाठी ई-कटंट तयार करणे या महत्त्वपूर्ण कामकाजासाठी विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक विभागातील कार्यालय टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनने घेतला आहे. विद्यापीठातील कार्यालय सुरू असून, प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होत आहेत.
केंद्र व राज्य सरकारने 1 ते 30 जून असा लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. या काळात विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शैक्षणिक कामकाज बंद राहणार असल्याचे विद्यापीठाने कळविले होते. त्यानंतर सुधारित परिपत्रक प्रसिद्ध करून विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक कार्यालये 3 जूनपासून सुरू करण्यात येत असून, त्यासाठी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेशाचे परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढले आहे. दरम्यान, गेल्या 70 दिवसांत विद्यापीठ बंद असल्याने प्रलंबित कामाचा काही प्रमाणात निपटारा करण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने कार्यालय सुरू करण्याचे आदेश दिल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले.
विद्यापीठातील गट ‘अ’ व गट ‘ब’ मधील सर्व अधिकारी व गट ‘ड’मधील सर्व सेवकांना नियमितपणे उपस्थित राहतील. प्रत्येक प्रशासकीय कार्यालयातील गट ‘क’मधील शिक्षकेतर सेवकांपैकी केवळ 15 टक्के जणांना रोटेशनप्रमाणे कार्यालयात बोलावावेत. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रात निवास असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना कार्यालयीन कामकाजासाठी बोलावू नका. अशा कर्मचाऱ्यांनी प्रशासन शिक्षकेतर कक्षाकडे तसे कळवावे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा विभाग, आरोग्य केंद्र, स्थावर विभाग व गृहव्यवस्थापन विभाग ही कार्यालये अत्यासेवक सेवा प्रदान करणारी कार्यालये असल्याने ती पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील, असेही कुलसचिवांनी परिपत्रकात म्हटले आहे.