पुणे (वृत्तसंस्था) – शिक्रापूर, वढू बुद्रुक ता. शिरूर येथून एका युवकाला बोलावून घेऊन त्याचे अपहरण केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका महाराजासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने सदर प्रकरणातील महाराज व त्याच्या साथीदारांना अटक केली असल्याची घटना घडली आहे.
वढू बुद्रुक ता. शिरूर येथील छाया लोले यांचा भाऊ गजानन घारे हा लोले यांच्या घरी असताना त्याला गावातील ईश्वर ढगे याचा फोन आला आणि आपल्याला बाहेर जायचे आहे, तू एकटा ये असे म्हणाल्याने गजानन हा त्याच्या बहिणीला याबाबत सांगून त्याच्या जवळील एम.एच १४ डी एस ६०३४ या दुचाकीहून कोरेगाव भीमा येथे गेला. त्यांनतर त्याची दुचाकी कोरेगाव भीमा येथील एका बोळीमध्ये लावून ईश्वर ढगे याचे सोबत तुळापुर येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. त्यावेळी गजानन घारे, अजित शितोळे ( महाराज ), ईश्वर ढगे, रोहिदास गायकवाड हे सर्वजण जेवण करत होते, त्यांनतर गजानन हा कोठे गेला याबाबत काहीही माहिती मिळाली नाही, याबाबत बेपत्ता गजाननच्या बहिणीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गजानन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. गजाननचा शोध घेतला असता तो कोठेही मिळून आला नाही, त्यांनतर गजानन सोबत असलेल्या तिघांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे गजाननच्या बहिणीला तिघांवर गजाननचे अपहरण केल्याबाबत संशय आल्याने बेपत्ता गजानन ज्ञानोबा घारे जवळगाव ता. मुळशी जि पुणे यांची बहिण छाया बाळासाहेब लोले वय ४० वर्षे रा. वढू बुद्रुक ता. शिरूर जि. पुणे यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अजित पांडूरंग शितोळे ( महाराज ) रा. न्हावी सांडस ता. हवेली जि. पुणे, ईश्वर शिवाजी ढगे, रोहिदास राघुजी गायकवाड दोघे रा. आपटी ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत गुन्हा दाखल होताच शिक्रापूर पोलिसांनी वरील तिघांना अटक करून शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका महाराजासह दोघांवर युवकाच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असताना, सदर प्रकरणामध्ये अपहरण झालेल्या युवकाकडून महाराजा कडे लाखो रुपयांची मोठी उलाढाल झाल्याचे समोर आले आहे, तर पोलिसांनी सदर महाराजाच्या घरी जाऊन पाहणी केली असता त्याच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे काही साहित्य मिळून आले आहे, परंतु अपहरण झालेला इसम समोर आल्यानंतर सर्व काही समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.