पुणे (वृत्तसंस्था) – लॉकडाऊन 5 मध्ये राज्य शासनाकडून काही नियम शिथिल केले. सोमवारपासून काही खासगी कार्यालये, दुकाने आदी सुरू झाले. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत होते. मात्र, सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्यांना घरापासून कामाचे ठिकाण गाठण्यासाठी अडथळ्यांची शर्यत करावी लागली. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याची मागणी होत आहे.
मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसमधून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती आणि रिक्षांतून केवळ अत्यावश्यक कारण असल्यास प्रवास करता येत होता. मात्र, लॉकडाऊन शिथिल होत असल्याने आता दैनंदिन व्यवहार सुरू होत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलने सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याशिवाय, रिक्षादेखील उपलब्ध झाल्यास ये-जा करणे सोयीचे होणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
उद्योगांसाठी घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींशिवाय, अनेकांना काही कारणास्तव घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीशिवाय अन्य पर्याय नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. स्वारगेट-कात्रज, स्वारगेट-धायरी, स्वारगेट-हडपसर, पुणे स्टेशन-वाघोली, पुणे स्टेशन-लोहगाव, पुणे स्टेशन-विश्रांतवाडी, पुणे स्टेशन-हडपसर, डेक्कन-वारजे, डेक्कन-कोथरूड या मार्गांवर बस सुरू होऊ शकतात, याची चर्चा पीएमपीएमएलच्या वर्तुळात सुरू आहे. या चर्चेला अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे.
पीएमपीएमएलच्या बरोबर रिक्षादेखील सुरू व्हाव्यात, अशी मागणी प्रवाशांबरोबरच शहरातील रिक्षा संघटनांकडून करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे रिक्षा दारात उभी असल्याने अनेक चालकांकडे आर्थिक संकट उभे आहे. परिणामी रिक्षा वाहतुकीला परवानगी दिल्यास आर्थिक चक्र फिरायला सुरुवात होणार असल्याचे रिक्षा चालक सांगतात.