नगरदेवळा येथील नऊ शिक्षकांची मान्यता रद्द

नगरदेवळ (वार्ताहर ) – जिल्ह्याचे तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या स्कॅन करून बोगस शिक्षक भरती प्रक्रिया झाली होती. त्यासंबंधी तक्रार दाखल केली असता नगरदेवळा येथील.सरदार एस के पवार विद्यालय येथील नऊ शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्याचे आदेश नितीन उपासनी (शिक्षण उपसंचालक , नाशिक )यांनी दिले आहे
दिड वर्षांपूर्वी तत्कालीन शिक्षण अधिकारी (जि प.जळगांव) यांच्या स्वाक्षऱ्या स्कॅन करून जिल्ह्यातील बहुतांश संस्थाचालकांनी शिक्षकांच्या नियुक्त्या केल्याचे आमदार किशोर पाटील यांनी निदर्शनास आणले होते. काही संस्था चालकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. सरदार एस के पवार विद्यालयाबद्द्ल देखील अभिजित पवार, प्रकाश काटकर, केदार बोरसे, माधवराव शिंदे, विलास पाटील यांनी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली होती. तसेच सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार 25 ऑगस्ट, 7 सप्टेंबर, 30 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती.
उर्दू शाळेतील शिक्षक इतेश्याम शेख, जहांगीर शेख गुलाम, सादिक शेख बिस्मिल्ला, यांच्या मान्यतेबाबत तत्कालिन शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी अभिप्राय पत्र मिळाले नसल्याचे नमूद केल्याने त्यांना पत्र उपलब्ध करून देण्यात आले. महाजन यान्च्या.उपरोक्त 3 मान्यता आदेशावर स्वाक्षरी आहे किंवा कसे? याचा अहवाल सात दिवसात सादर करावा असे निर्देश देण्यात आले.
हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबतचा निर्णय देण्यात येईल. तोपर्यंत या तीन मान्यता आदेशांना संधी देण्यात येत आहे. श्रीमती संगीता मोरे व मनीषा परदेशी यांची नियुक्ती विनाअनुदानित तत्त्वावरील असून त्यांना विनाअनुदानित कडून अनुदानित पदावर बदलीने नियुक्तीस मान्यता बी.जे.पाटील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिलेली आहे चौकशीत शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांना विनाअनुदानित कडील तुकडी मान्यता सादर करण्यास नमूद केले असता त्यांनी शाळेत विनाअनुदानित तुकडी कार्यरत नसल्याचे निवेदन दिले. शिक्षणाधिकारी यांनी मान्यते बाबत संचिका व आदेश पडताळणी करीता सात दिवसांची मुदत मागितली त्यास मान्यता देण्यात आली.
या शाळेत विनाअनुदानित तुकडी कार्यरत नसल्याचे लक्षात घेता या दोन मान्यता स्थगित करण्यात येत असून शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले
शिक्षणाधिकारी यांच्या अहवालानुसार तसेच मुख्याध्यापकांच्या निवेदनानुसार उपशिक्षक अंजली पाटील, राणी पाटील, शैला साळुंके, ललीता पाटील, राहुल परदेशी, अनिता ठाकरे, प्रेमनाथ भोसले,सौरभ तोष्णीवाल, यजुर्वेदसिंग राऊळ हे शाळेत कधीही उपशिक्षक पदावर नव्हते. संबंधितांच्या उपशिक्षक म्हणून दिलेल्या मान्यता तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्य.) .महाजन यांनी आपली स्वाक्षरी नसल्याचे नमूद केल्याने ती मान्यता अवैध असल्याचे सिद्ध होते.
मुख्याध्यापक यांनी अनुक्रमांक 1 ते 9 नमूद उपशिक्षक यांना ओळखत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे शिक्षक कार्यरत नसल्याने व त्यांनी सक्षम अधिकारी यांच्याकडून मान्यता घेतल्या नसल्याने 9 शिक्षकांच्या मान्यता पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येत आहे असे आदेश शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी नाशिक यांनी दिले आहेत. बोगस भरती प्रक्रिया राबवून जवळचे नातेवाईक व मर्जीतील लोकांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी म्हणून संस्थेत भरती केले आहे. असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. बोगस कागदपत्र बनवून बेरोजगार शिक्षकांची व शासनाची आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट नगरदेवळा व परिसरात सक्रिय आहे. त्यात संस्थाचालक व दुसऱ्या ठिकाणी नोकरी करणारे दलाल यांचाही समावेश आहे.
आता संस्था नऊ शिक्षकांवर की नऊ शिक्षक संस्था चालकांवर गुन्हे दाखल करतात ? हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.







