इस्लामाबाद ( वृत्तसंस्था ) – आंततरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून ओळख असलेल्या १२ संघटनांसाठी पाकिस्तान हे सुरक्षित आश्रयस्थान आहे ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या भारताला लक्ष्य करणाऱ्या पाच दहशतवादी संघटनांचा समावेश आहे.

दहशतवादाबाबत अमेरिकेच्या स्वतंत्र काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस (सीआरएस) च्या अहवालात पाकिस्तानबाबत मोठे खुलासे करण्यात आले आहेत. अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये १२ दहशतवादी संघटना आहेत. त्यापैकी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या पाच दहशतवादी संघटनांचे लक्ष्य भारत आहे. सीआरएसच्या अहवालानुसार अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला अनेक सशस्त्र आणि बिगर-राज्य दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानातून दहशतवादी संघटना दहशतवादी कारवाया करतात. काही दहशतवादी संघटना १९८० पासून अस्तित्वात आहेत.
गेल्या आठवड्यात क्वाड शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला अमेरिकन काँग्रेसच्या द्विपक्षीय संशोधन शाखेने हा अहवाल जारी केला आहे. पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या या संघटनांना मोठ्या प्रमाणात पाच श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते. यामध्ये जागतिक स्तरावरील दहशतवादी संघटना, अफगाण-केंद्रित, भारत आणि काश्मीर-केंद्रित, देशांतर्गत व्यवहारांपर्यंत मर्यादित असलेल्या संघटना आणि पंथ-केंद्रित (शिया विरुद्ध) दहशतवादी संघटनांचा समावेश आहे असे अहवालात म्हटले आहे.
लष्कर ए तोयबाची स्थापना १९८० मध्ये पाकिस्तानमध्ये झाली आणि २००१ मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले. सीआरएसने म्हटले आहे की, “एलईटी हा भारतातील मुंबईतील २००८ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यासाठी तसेच इतर अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते.”
जैश-ए-मोहम्मदची स्थापना २००० मध्ये काश्मिरी दहशतवादी नेता मसूद अझहरने केली होती. २००१ मध्ये त्याला एफटीओ म्हणूनही घोषित करण्यात आले होते. एलईटी सोबतच जेईएम २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यासह इतर अनेक हल्ल्यांसाठी देखील जबाबदार आहे.
हरकत-उल जिहाद इस्लामीची स्थापना १९८० मध्ये अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत सैन्याशी लढण्यासाठी करण्यात आली होती. २०१० मध्ये या संघटनेला आंतरराष्ट्रीय दशतवादी संघटना घोषित करण्यात आली. हुजी आज अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतात कारवाया करत आहे काश्मीर पाकिस्तानमध्ये विलीन व्हावे अशी त्यांची इच्छा आहे.
हिज्बुल मुजाहिद्दीनही दहशतवादी संघटना १९८९ मध्ये स्थापन झाली होती. ही पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या इस्लामवादी पक्षाची दहशतवादी शाखा आहे आणि २०१७ मध्ये एफटीओच्या यादीत त्याचा समावेश झाला. जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेली ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी दहशतवादी संघटना आहे.
इतर दहशतवादी संघटना जे पाकिस्तानमधून आपल्या कारवाया करतात त्यात अल कायदा समाविष्ट आहे. अल कायदा प्रामुख्याने कराची आणि अफगाणिस्तान येथून कार्यरत आहे. अयमान अल-जवाहिरीने २०११ पर्यंत त्याचे नेतृत्व केले आणि देशातील इतर अनेक दहशतवादी संघटनांशी त्याचे सहकारी संबंध आहेत.
पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या इतर दहशतवादी संघटनांमध्ये अल कायदा इन इंडिया सबकॉन्टिनेंट, इस्लामिक स्टेट खोरासन प्रांत , अफगाणिस्तान टेलन, हक्कानी नेटवर्क, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान , बलुचिस्तान लिबरेशन आर्मी , जुंदल्ला (उर्फ जैश अल-अदल), सिपाह-ए-सहबा पाकिस्तान आणि लष्कर-ए-झांगवी यांचा समावेश आहे.







