असोद्यातील घटना ; भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील असोदा येथे धनजी नगरमध्ये सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भटक्या कुत्र्याने बालकाला फरफटत नेले. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यामुळे कुत्र्याने पळ काढला. या घटनेत बालकाच्या उजव्या हाताला कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहे. जिल्ह्यात कुत्र्याच्या चाव्याच्या घटना वाढत असून जिल्हा प्रशासनाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.
असोदा येथे सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रशांतजीत पवन सोनवणे (वय ४) हा बालक घराजवळ शौचास बसला होता. त्यावेळी अचानक एका भटक्या कुत्र्याने येऊन त्याची शर्टाची कॉलर तोंडात धरत फरफटत नेऊ लागला. ग्रामस्थांना प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड केली. तोवर काही अंतरापर्यंत कुत्र्याने नेत उजव्या हाताला चावा घेतला. यामुळे बालक घाबरून रडायला लागले. बालकांच्या कुटुंबीयांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे आणि पथकाने त्याच्यावर उपचार करून त्याला दिलासा दिला. यावेळी ग्रामस्थांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शासकीय रुग्णालयात कुत्रे चावल्यावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.