जाफराबाद तालुक्यातील कार्यालय होताहेत सुंदर आणि अपडेट
जवळपास 600 शिक्षकांच्या सेवापुस्तिका होत आहे अद्ययावत
टेंभुर्णी प्रतिनिधी / ( सुनिल भाले )
सध्या संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांत ‘सुंदर माझे कार्यालय’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत सर्व कार्यालयांची साफसफाई, रंगरंगोटी सजावट व कार्यालयीन रेकॉर्ड अपडेट
ठेवणे आदी काम करून कार्यालयांची सुंदरता वाढविली जात आहे.
जाफराबाद गटसाधन केंद्राने या उपक्रमांतर्गत तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या सेवापुस्तिका अद्ययावत करण्याचा विडा उचलला आहे.
गटशिक्षणाधिकारी डॉ. सतीश सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या
तालुक्यातील सर्व 11 केंद्रांतील 594 शिक्षकांच्या सेवापुस्तिका अद्ययावत
केल्या जात आहेत.
१४ जूनपासून या उपक्रमाला प्रारंभ झाला असून, यामध्ये दररोज दोन ते तीन केंद्रातील शिक्षकांच्या सेवापुस्तिकांची पडताळणी केली जात आहे. या सेवापुस्तिकेतील सर्व अपूर्ण नोंदी वेळीच पूर्ण करून त्यावर गटशिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी घेतली जात आहे. यासाठी प्रत्येक केंद्राचे केंद्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक व तज्ञ शिक्षक परिश्रम घेत आहेत. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी
गटशिक्षणाधिकारी डॉ. सतीश सातव, शिक्षण विस्तार अधिकारी जिनेंद्र जैन, शिवाजी फोलाने, राम खराडे, कार्यालयीन अधीक्षक चेके आदी पुढाकार घेत आहेत. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी सातव यांनी तालुक्यातील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठीही विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांतर्गत नवीन शैक्षणिक वर्षात
मुलांना मोठा लाभ होणार आहे. या उपक्रमांसाठीही शिक्षकांना प्रोत्साहन
दिले जात आहे.
“सेवापुस्तिका म्हणजे
कर्मचाऱ्याचा आत्मा असतो.
सेवापुस्तिका अद्ययावत नसेल तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी
मोठ्या अडचणी येतात.
गटशिक्षणाधिकारी डॉ. सातव यांनी शिक्षकांच्या सेवापुस्तिका सर्व नोंदीसह अद्ययावत करण्याचा जो उपक्रम तालुक्यात सुरु केला तो प्रशंसनीय आहे. यामुळे अनेक शिक्षकांच्या सेवापुस्तिका अपडेट
होणार आहेत. यासाठी सर्व शिक्षक संघटनांचेही भरीव सहकार्य लाभत आहे.”
– संजय निकम,
शिक्षक नेता, जाफराबाद.