प्रहार शेतकरी संघटनेचा आरोप
वडती ता. चोपडा प्रतिनिधी :— चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. 4 मार्च रोजी गहू मोजणी दरम्यान राडा झाला असून सदर शेतकऱ्याचा गहू व्यापारी राजू नेवे (ओम ट्रेडिंग कंपनी ) यांनी खरेदी केला व सदर गहू मोजणीस व्यापारी , मापाडी व कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रतिनिधी यापैकी एकही प्रतिनिधी उपस्थित नसताना हमालाने गहू मोजणीस सुरवात केली व शेतकऱ्याने खाली बारदानाचे वजन करण्यास सांगितले असता सदर खाली बारदानचे वजन 120 ग्रॅम भरले पण व्यापाऱ्यांनी मला सदर बारदानचे वजन 200 ग्रॅम घ्यायला सांगितले आहे असे हमालाने शेतकरी प्रल्हाद धनगर ( नरवाडे ) यांना सांगितले .शेतकऱ्याने सदर बाब चुकीचे असल्याचे सांगितले असता हमालाने सदर गहू मोजण्यास नकार दिला व तुम्ही कुठेही तक्रार केली तरी आमचे काहीच होणार नाही असे धमकावले .
शेतकरी प्रल्हाद धनगर ( नरवाडे ) यांनी गव्हाचे एक कट्टा दोन वजन काट्यावर मोजून पाहिले असता दोन्ही वजन काट्यात तफावत दिसून आली , जवळपास दोन्ही वजन काट्यात जवळपास 300 ते 400 ग्रॅमचा फरक आढळून आल्याने शेतकऱ्याने सदर बाब प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या लक्षात आणून दिली .
प्रहार संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कांतीलाल पाटील व उपसभापती नंदकिशोर पाटील यांच्यासह कर्मचारी व व्यापारीसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित झाले व घडलेली घटना चुकीची असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी व कर्मचारी यांनी मान्य करत माल मोजणी करणाऱ्या हमालास शेतकऱ्यांची माफी मागण्यास सांगितले .माल खरेदी करणारे व्यापारी यांना सदर प्रकारा बाबत विचारणा केली असता मी हमालास माल मोजणी करण्यास सांगितले नसल्याचे उत्तरे दिली .
त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यावेळी रवींद्र पाटील तालुकाध्यक्ष – प्रहार संघटना , बाजार समितीचे सभापती कांतीलाल पाटील , उपसभापती नंदकिशोर पाटील , व्यापारी राजू नेवे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते .
शेतकरी संघटनेच्या वतीने यावेळी विविध मागण्यांची मागणी करण्यात आली त्यात प्रत्येक व्यापाराने एका ठिकाणी बसून लिलाव न करता , शेतकऱ्यांच्या वाहना जवळ जाऊन लिलाव करावा व एक नाही तर दहा वेळा मालाची बारकाईने पाहणी करावी ,लिलाव झाल्यानंतर कोणतीही कारणे सांगून पुन्हा लिलाव केला जाईल व पुन्हा भाव ठरवला जाईल असं सांगून शेतकऱ्यास वेठीस धरू नये , शिरपूर व अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच पेमेंट अदा केले जाते तर चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत दहा ते पंधरा दिवसानंतरचा चेक दिला जातो व सदर चेकवर सही घेण्यासाठी व्यापार्याच्या घरी किंवा त्याच्या दुकानावर शेतकऱ्याला चकरा माराव्या लागतात तरी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील यापुढे पेमेंट चेक न देता रोखीने पेमेंट अदा करावे .,यापुढे व्यापाऱ्याने चेक दिला तर सदर व्यापाऱ्यांवर कारवाई करावी . अमळनेर – शिरपूर बाजार समितीत चोपडा बाजार समिती पेक्षा जास्त दराने भाव मिळतो मग चोपड्यात भाव कमी का दिला जातो ? भाव कमी ठरवला जातो का ? याचीही चौकशी करावी . इतर बाजार समितीत कट्टी न लावता माल खरेदी केला जातो व चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कट्टी लावून माल खरेदी करतात .शेतकरी सकाळपासून भाड्याची वाहने घेऊन बाजार समितीत हजर राहतो आणि व्यापारी त्यांच्या वेळेप्रमाणे येतात , त्यामुळे लिलावास उशीर होतो व परिणामी शेतकऱ्यास माल मोजणी करताना रात्रीचे दहा वाजतात तर लिलावाची वेळ निश्चित ठरवावी अशी ही मागणी करण्यात आली
आहे . चोपडा बाजार समितीत व्यापाऱ्यांची एकता असल्यामुळे ते आपल्या मर्जीप्रमाणे मालाची किंमत ठरवतात त्यामुळे तालुक्याच्या शेतकरी हवालदिल झाला आहे .शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही त्यामुळे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत इतर तालुक्यातील व्यापाऱ्यांना देखील माल खरेदी करण्यास परवानगी द्यावी , जेणेकरून तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल अशा विविध स्वरुपाच्या मागण्या उपस्थित शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
झालेल्या प्रकाराचा व्यापाऱ्यांना राग आल्याने काही काळ माल मोजणी व माल लिलाव थांबवून व्यापाऱ्यांनी तातडीची बैठक घेतली व सदर बैठकीत ओम ट्रेडिंग कंपनीचे मालक राजू नेवे ह्यांनी भावनिक होत व्यापाऱ्यांना एकत्रित करून शेतकऱ्यांना वेठीस धरत सुमारे एक तास लिलाव प्रक्रिया बंद पाडली व बाजार समितीचे सभापती कांतीलाल पाटील व उपसभापती नंदकिशोर पाटील यांनी व्यापाऱ्यांची मनधरणी करत लिलाव प्रक्रिया सुरू करण्यास विनंती केली त्यांनतर लिलाव प्रक्रिया सुरू झाली .
यापुढील तीन दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असणार असल्याचे बाजार समिती तर्फे सांगण्यात आले .