मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला आज (23 नोव्हेंबर) वांद्रे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर व्हायचे आहे. कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिला दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, वैयक्तिक कारण देत ती दोन्ही वेळा गैरहजर राहिली होती. त्यानंतर तिला तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला होता. तिसरा समन्स हा ‘फायनल अल्टीमेटम’ असून, आताही कंगना अनुपस्थितीत राहिल्यास तिला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी 18 नोव्हेंबर रोजी तिसऱ्यांदा समन्स बजावला होता. कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. 23 नोव्हेंबरला कंगनाला, तर 24 नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. विशेष म्हणजे यापूर्वी दोन वेळा या दोघींनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. यातील एका समन्सला उत्तर देताना त्यांनी घरात लग्न असल्याचे कारण दिले होते. तर दुसऱ्या समन्सला त्यांनी काहीही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता या चौकशीसाठी तरी कंगना आणि तिची बहिणी हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
दोघींनाही तिसऱ्यांदा समन्स
कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतविरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाने आदेश दिल्यानंतर त्यांना पहिला समन्स हा ऑक्टोबर महिन्यात बजावण्यात आला होता. त्यांना अनुक्रमे 26 ऑक्टोबर आणि 27 ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्यावेळी त्या दोघीही चौकशीसाठी आल्या नव्हत्या. यानंतर त्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुसरा समन्स बजावला होता. यात त्यांना 9 आणि 10 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावेळी त्यांनी घरगुती लग्नाचे कारण दिले होते.
पहिला समन्स – 26 आणि 27 ऑक्टोबर
दुसरा समन्स – 9 आणि 10 नोव्हेंबर
तिसरा समन्स – 23 आणि 24 नोव्हेंबर
कंगना विरोधात याचिका दाखल
कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतविरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात कंगना विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.
दिग्दर्शक साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत







