गुवाहाटी (वृत्तसंस्था) – देश करोना विषाणूंशी लढत असताना आसाममध्ये अफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची साथ आली आहे. यामुळे १२ हजार डुक्करांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर याचा मोबदला मालकांना देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पशूधन विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि, अफ्रिकन स्वाईन फ्ल्यूमध्ये आतापर्यंत १४ जिल्ह्यांमधील १८ हजार डुक्कर मरण पावली आहेत.
विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत आसामच्या मुख्यमंत्र्यांनी म्हंटले कि, १२ हजार डुकरांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशाचे आणि तज्ज्ञांच्या मतांचे पालन केले जाईल. त्यांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
दरम्यान, आफ्रिकी स्वाईन फ्लूचा करोना व्हायरसशी काहीही संबंध नाही, असे याआधीच स्पष्ट करण्यात आले होते. या आजाराने देशात फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदाच शिरकाव केला होता. आसाममार्गाने आफ्रिकी स्वाईन फ्लू भारतात दाखल झाला आहे.