जळगाव (प्रतिनिधी) – महानगर पालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेत नवीन आठ सदस्यांची स्थायी समितीमध्ये वर्णी लागली. आता सभापती पदासाठी भाजपच्या तिघांमध्ये रस्सीखेच असली तरी सभापती म्हणून ललित कोल्हे यांची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महानगर पालिकेमध्ये भाजपचे ५७ आणि स्वीकृत ४ असे ६१ सदस्य आहेत. स्थायी समितीमध्ये आता १६ पैकी १२ सदस्य आहेत. विद्यमान सभापती शुचिता हाडा या आठ दिवसांमध्ये निवृत्त होत आहे. त्यामुळे लवकरच सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. भाजपतर्फे सभापती म्हणून राजेंद्र घुगे पाटील, उज्ज्वला बेंडाळे आणि ललित कोल्हे यांच्यात खरी स्पर्धा आहे. यातील राजेंद्र पाटील यांना मागील वर्षी भाजपकडून शब्द दिला होता. अशी माहिती कळते, तर उज्ज्वला बेंडाळे ह्या महापौर पदाच्या शर्यतीतील उमेदवार आहेत. तसेच भाजपा नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे तसेच सभागृह नेते असलेले ललित कोल्हे हे देखील स्थायी समिती सभापतींच्या शर्यतीत आहेत.
भाजप गोटातील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार ललित कोल्हे यांना यंदाच्या सभापती पदाचा मान मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. ललित कोल्हे यांनी सभापती पदासाठी मोर्चेबांधणी केली असून भाजपच्या अनेक नगरसेवकांनी ललित कोल्हेंच्या नावाला पसंती दिल्याचे दिसून येत आहे.