महासभेत विविध विषयांना मंजुरी
जळगाव (प्रतिनिधी) – बुधवारी झालेल्या महासभेच्या बैठकीत अजिंठा चौफुली जवळील महापालिकेच्या जागेवरील भंगार बाजाराची जागा ताब्यात घेण्याच्या प्रस्तावावरुन भाजप-शिवसेना सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यात अखेर शिवसेना आणि एमआयएम पक्षाने या प्रस्तावाला विरोध केला. मात्र सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. तसेच प्रभागांना दिल्या जाणाऱ्या रस्ते दुरुस्ती निधीवरून प्रशासनाला सेनेच्या सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. व्यापाऱ्यांना टाळेबंदीच्या काळात दुकाने बंद असल्यामुळे कर माफी देण्याचा विषय देखील सर्वानुमते मंजुर झाला.
जळगाव महापालिकेची बुधवार २३ रोजी महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. व्यासपिठावर आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. सुरवातीला २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षणाची माहिती प्रशासनाने दिली. यावेळी अहवाल सर्व सदस्यांना अवगत केला आहे का? असा प्रश्न नितीन यांनी उपस्थित केला. यावर उपायुक्त वाहुळे यांनी सर्वपक्षातील गटनेत्यांना अहवाल दिला असल्याची माहिती दिली. मात्र नगरसेवकांनी माहिती दिली नसल्याचे सांगितले.
शहरातील मुख्य चौक अजिंठा चौफुली परिसरातील भंगार बाजार ९९ वर्षाकरीता भाडेतत्वाने देणे बाबत तत्कालीन नगरपालिकेचा ठराव रद्द करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावावर समिती गठित करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्रशासनाने महासभेत मांडला. विषयाला एमआयएम पक्षाचे गटनेते रियाज बागवान यांनी हरकत घेतली. दोनशे लोकांचा उदरनिर्वाहचा प्रश्न आहे. त्यांचा विचार करण्यात आला नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच शिवसेना सदस्य इब्राहिम पटेल यांनी देखील हरकत घेत तीस वर्षापूर्वीचा विषय असून तेथील विक्रेत्यांना अतिक्रमण धारक समजले जाते. त्यामुळे हा ठराव तूर्त रद्द करावा अशी मागणी केली. कैलास सोनवणे यांनी, या अहवालावर सखोल चर्चा झाली असून दोन वर्षापासून कोणीही सदस्याने विरोध केला नाही. आज का विरोध का करता असा प्रश्न उपस्थित केला. नितीन लढ्ढा यांनी, सदर समितीचे गठन बेकायदेशीर असून या समितीच्या मांडलेला ठराव देखील बेकायदेशीरच आहे, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण पक्षीय बलाबल पाहून समिती नेमावी. त्याचा अहवाल तयार करावा अशी मागणी केली. या प्रस्तावाला शिवसेना व एमआयएमने विरोध कायम ठेवला, तर भाजपाने बहुमताने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
पिंप्राळा शिवारातील गट नंबर ९३ ची खुली जागा विकसित करून तंट्याभिल संस्थेला देण्याची मागणी पार्वताबाई भिल यांनी केली होती. त्यावर हि जागा मनपाने विकसित करावी अशी सूचना शुचिता हाडा यांनी केली. प्रभाग क्रमांक १० मध्ये दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत प्राप्त निधीमधून प्रस्तावित आठ कामे मंजूर करण्यात आली. व्यावसायिक व उद्योजकांना घरपट्टी कारमध्ये सूट मिळावी म्हणून दीपक सूर्यवंशी आणि भाजपच्या नगरसेवकांनी पत्र दिले होते. त्यावर शुचिता हाडा यांनी सांगितले की, मालमत्ता धारकांनी प्रशासनाला माहिती कळविण्याची गरज नाही. सभेत, शहरातील व्यवसायीक व उद्योजकांची दुकाने टाळेबंदीच्या ज्या कालावधीत बंद होते, त्या काळातील कर माफीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. त्यात मागील थकबाकी भरणे आवश्यक आहे, अशी अट घालण्यात येणार आहे.
शिवाजीनगर भागातील हमालवाडा परिसर व दालमिल समोरील सार्वजनिक शौचालय पे अँड युज तत्वावर वापरायला देण्यासाठी मंजुरी देण्यात आली. डॉ.आंबेडकर मार्केट मधील हॉल तीस वर्षे भाडे कराराने जीवन विकास सामाजिक संस्थेला देण्याचा प्रस्तावाला शिवसेनेचे इब्राहिम पटेल यांनी आक्षेप घेतला मात्र, प्रस्ताव मंजूर झाला. महासभा ऑनलाईन झाली. सभागृहामध्ये महापौर, आयुक्त, नगरसचिव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यांची उपस्थिती होती. अनेक नगरसेवक हे घरून सहभागी झाले होते. यावेळी तांत्रिक अडचणींमुळे आवाज व्यवस्थित ऐकू येत नव्हता. त्यामुळे अनेक विषय समजण्यात नगरसेवकांना अडचणी आल्या.