मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेड झोनमध्ये असलेल्या मीरा भाईंदरकरांना आज “गुड न्यूज” मिळाली आहे. पालिकेच्या कोविड रुग्णालयातून कोरोनापासून मुक्त झालेल्या 56 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त, डॉक्टर आणि नर्स यांनी टाळ्या वाजवत या रुग्णांना निरोप दिला आहे. यावेळी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णाच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू तरळले. यामध्ये एका दोन वर्षीय चिमुकलीचाही समावेश होता.
मीरा-भाईंदर शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण 27 मार्च रोजी आढळून आला होता. यात दर चार दिवसांनी दुप्पट रुग्णाची वाढ होउन 11 एप्रिल पर्यंत ही संख्या 102 वर पोचली. याची गंभीर दखल महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी घेतली. 18 एप्रिल पासून शहरातील औषध आणि दुधाची दुकाने वगळता संपूर्ण लॉकडाउन पुकारला. या काळात नागरिकांची अडचण होउ नये म्हणून किराणा सामना, भाजीपाला, चिकन, मटण, मासळी यांची होम डिलिव्हरी सुरू केली. याचा परिणाम दिसून आला आणि रुग्ण दुपटीचा कालावधी थेट 22 दिवसांवर पोचला.