जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता शासन स्तरावरून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभुमीवर बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे लावावी, असे आदेश अपर जिल्हाधिकारी, जळगाव डॉ. नंदकुमार बेडसे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई अगर उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मास्क, सॅनिटाईजर्स, हँड वॉश, हँड ग्लोव्हज व तत्सम बायोमेडिकल साधनांचा वापर केला जात आहे. ही सर्व साधने व उपकरणे बायोमेडिकल असल्याने त्यांचा वापर झाल्यानंतर महापालिका/ नगरपालिका/ नगरपंचायत/ क्षेत्रातील सार्वजनिक कचऱ्याच्या ठिकाणी, उघड्यावर, रस्त्यांवर फेकून दिली जातात. अशा प्रकारचा बायोमेडिकल कचरा उघड्यावर फेकल्याने त्याचे मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बायोमेडिकल कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात अशाप्रकारे आढळून येणारा बायोमेडिकल कचरा गोळा करून त्याची शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही महानगरपालिका आरोग्य विभागाची राहील. तर नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्या-त्या मुख्याधिकाऱ्यांवर राहील. महानगरपालिका व नगरपालिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी यांनी काटेकोरपणे कार्यवाही करावी. जे डॉक्टर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी कामावर हजर नसतील त्यांना तात्काळ कामावर रुजू होण्यासाठी आदेश देण्यात यावेत.