जळगाव (प्रतिनिधी) – रावेरचे सत्र न्यायालय आणि औरंगाबादच्या पोलिस उपमहानिरीक्षकांच्या आदेशावरून जळगाव जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या रावेरच्या दंगलीतील 80 आरोपींची नंदुरबारच्या वर्ग-1 कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे. या 80 पैकी 41 आरोपींना आज ( 3 एप्रिल रोजी ) नंदुरबारच्या वर्ग-1 कारागृहात रवाना करण्यात आले. उर्वरित आरोपी यानंतर पाठवले जाणार आहेत.
186 पुरूष व 14 महिला मिळून जळगावच्या जिल्हा कारागृहाची क्षमता 200 बंदींची आहे. तथापि सध्या या कारागृहात 452 बंदी ठेवलेले आहेत. क्षमतेच्या दुप्पट संख्या झाल्याने व सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आधीच दक्षता घेत हा बंदींच्या स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जळगाव कारागृहाचे प्रभारी अधीक्षक आशिष गोसावी यांनी दिली. या 41 बंदींना नंदुरबारला पाठविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तात्काळ गार्ड उपलब्ध करून दिले होते.